Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

मंदिरातील कार्यक्रम

 

श्री देव केदारलिंग, महालक्ष्मी, त्रिमुखी या देवस्थानाची वार्षिक पर्वनीची यादी

 

१. चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी देवीच्या होळीची सांगता तोडन होते.

२. मृग नक्षत्रात देवीची वाफेची राखण होते कारण देवीने गावचे रक्षण करावे तसेच गावातील लोकांची  पेरणी व्यवस्थित होऊन चांगल्या प्रकारे वाफ रुजून यावी व त्यानिमित्त संपूर्ण गावाला भोजन दिली जाते.राखण झाल्यानंतर देवीला उद्यापन दिले जाते.

३. श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) या दिवशी देवळाच्या परिसराची बेनणी (सापड) व स्वच्छता केली जाते हे सर्व काम ग्रामस्थ मिळुन करतात.

४.श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी श्री सोमेश्वराच्या मंदिरामध्ये एकका असतो. (एकका म्हणजे एकः पाळला जातो त्याठिकाणी चोवीस तास हरिनामाचा जयघोष चालू असतो).

५. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नवरात्र उत्सवात कोणत्याही प्रकारची देवी बाहेरून आणली जात नाही. देवीची षोडोपचारे ब्राम्हणाद्वारा यजमानासाहित त्रिकाळ पुजा होते. रात्री दररोज सामुदायिक आरती होते. त्यानंतर मनोरंज निमित्त देवीचे जागरण होते. या नऊ दिवसाच्या कालखंडात सप्त शतीचे पाठ वाचले जातात. अश्विन शुद्ध नवमीला उद्यापन होते. नवमीला देवीचे हवन, होम, पुर्णा हुती होते. त्यानंतर देवीच्या कलशाच्या पाण्याने सर्व भक्तगणांवर अभिषेक केला जातो. सप्त धान्याचे तृण (रोव) भक्तगणांना वाटला जातो. हे तृण (रोव) देवीचे पवित्रक म्हणून भक्तगणांना वाटला येतो. होम हवनानंतर देवीचे वळ परडी भुत, प्रेत, पिशाच्च इत्यादींना भक्ष स्वरुपात नैसर्गिक अतिशय पारंपारिक पद्धतीने प्रचलित जगात अत्यंत दुर्मिळ असा उत्सव साजरा केला जातो.

६. नरक चतुर्दशीला (दिपावली) देवीला अभ्यंग स्नान घालून देवीला दिवा केला जातो. तसेच त्यानिमित्त सर्वांना दिवा होतो. दिवा करताना 'इडा पिडा जाओ बळीचे राज्य येओ' असा सार्वत्रिक जयघोष केला जातो.

७. कार्तिक शुद्ध द्वादशी यादिवशी देवळाच्या दरातील तुळशी विवाह झाल्यानंतर गावातील सर्व तुळशी विवाह संपन्न होतात.

८. कार्तिक महिन्यात देवीला शेंद्याची राखण दिली जाते. कारण कार्तिक महिन्यामध्ये सर्व धान्य पिकलेले असते. ते सुखरूपपणे लोकांच्या हाती लागावे म्हणून हि राखण दिली जाते.

९. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा (देव दिपावली) यादिवशी देवीला रूपे सजवून देवीला दिवा होतो व ग्रामस्थांना हा दिवा (औक्षण) होतो. त्यादिवशी हि 'इडा पिडा जाओ बळीचे राज्य येओ' असा जयघोष केला जातो. त्यानंतर देवीचा गोंधळ (आराधना) होऊन देवीच्या उत्सवाची सांगता होते.

१०. मार्गशीर्ष महिन्यात देवीचा नवचंडीचा उत्सव होतो.

११. मार्गशीर्ष शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी हा तीन दिवसाचा स्वयंभू सोमेश्वरचा उत्सव संपन्न होतो. पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला सकाळी श्रीसोमेश्वारावर लघुउद्र (अभिषेक), दुपारी महाप्रसाद, सायंकाळी आरत्या, भोवत्या, कीर्तन. तिसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी श्रीसोमेश्वारावर लघुउद्र (अभिषेक), त्यानंतर देवळाच्या अंगणामध्ये तुळशी विवाह होतो दुपारी महाप्रसाद व सायंकाळी आरत्या, भोवत्या, कीर्तन व रात्री मनोरंजनासाठी नाट्य प्रयोगानंतर कीर्तनाने उत्सवाची सांगता होते.

१२. फाल्गुन शुद्ध पंचमी यादिवशी होळीला प्रारंभ होतो. सुमारे आठ ते नऊ दिवस वाडी वाडीवर होळी साजरी केली जाते. उदा. ('हिंगाला रे हिंगाला आमचा केदार बाबा खेळायला निघाला') होळी रे होळी  अशा विविध आनंदात साजरी व्हावी अशी देवीला प्रार्थना केली जाते. न्यानंतर पालखी, ढोल, ताशाच्या व सूर सनईच्या  गजरात देवीला पाच प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यानंतर पालखी प्रथेप्रमाणे पालखी चव्हाट्यावर जाते व देवीच्या होमाला प्रदक्षिणा घालून होम केला जातो. त्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न होते. त्यानंतर गावकरी आपआपल्या घरी जाऊन जेऊन ढोल, ताशे, सूर, सनई घेऊन होळी आणण्यासाठी नियोजित ठिकाणी जातात. रातोरात होळी घेऊन सुमारे तीन ते चार किलोमीटर होळी खांद्यावर खेळवत सर्व देवतांचा उदघोष  करत सहानेकडे निघतात. या उदघोषाला फाका घालणे असे म्हणतात. होळीची भेट होण्यासाठी देवीची पालखी सहनेवरून होळी असते तिथपर्यंत आणली जाते. त्यानंतर पालखी होळीला प्रदक्षिणा घालून पालखी पुढे व होळी मागे असे सर्व मिळुन सहानेकडे रवाना होतात. या सर्व प्रवासात भक्तगण आपआपल्या इच्छेने अल्पोपहार देतात. जागोजागी महिला होळीला औक्षण करतात. त्यानंतर होळी सहाणेवर आणली जाते. त्यानंतर पाषाण उचलण्याचा कार्यक्रम होतो. अनेक लोक आपआपल्या श्रद्धेनुसार शक्ती व युक्तीने पाषाण उचलण्याचा प्रयत्न करतात. जे पाषाण उचलतात ते पाषाण खांद्यावर घेऊन एक प्रदक्षिणा पूर्ण करतात त्यावेळी पाषाण उचलणाऱ्या माणसाचा जयजयकार करून त्याला शाबासकी दिली जाते.

१३. फाल्गुन शुद्ध पोर्णिमेला पालखी श्री देव सोमेश्वर मंदिराकडे जाते. मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून मंदिरात स्थानापन्न होते. त्यानंतर आंब्याची होळी आणून उभी केली जाते. त्यानंतर गाविक नमन होते त्यानंतर देवीला पोर्णिमेच्या शिमग्याचे गाऱ्हाणे (प्रार्थना) केली जाते. नंतर पुन्हा पाच प्रदक्षिणा घालून होमाला प्रदक्षिणा घालते व होम लागतो तेथून पालखी सर्वे येथील सहाणेवर येऊन भक्तगणांकडून ढोल, ताशे, सूर, सनईच्या गजरात विविध चालीवर खेळवली जाते. त्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न होते. तेथील स्थानिक लोकांचे प्रार्थना नवस होतात. तेथुन पालखी मुळ सहानेवर येते.

१४. याच दिवशी पालखी सहानेवर आल्यावर दोन्ही शिमग्याचे नारळ व पेढे स्वरुपात वाटण्यात येतात.

१५. दुसऱ्या दिवशी पालखी मुळ पुरुषाची समाधी तीवराड कोंड येते जाते. तेथे देवीची आणि समाधीची पूजापाठ होऊन देवीची ओट्या भरून व समाधीची पूजा व नारळ दिला जातो. त्यादिवशी सर्व मंडळीना अल्पोपहार दिला जातो व पालखी सहाणेवर येते. पुढील दिवशी पालखी गावभोवारी (शिंपणे) साठी रवाना होते. सर्वप्रथम पालखी राजसत्तेतील मनाचे देवधर येथे येते. त्यानंतर संपूर्ण घरोघरी पालखी फिरते. पालखी घरी गेल्यानंतर यजमान देवीची पुजा करून देवीला नैवैद्य दाखवतात व आपआपली प्रार्थना गुरवान मार्फत करतात. ज्या ज्या ठिकाणी पालखी जाते त्या त्या ठिकाणी आनंदाचे व उत्साहाचे स्वरूप असते. वाडीवाडीतून भक्तगणांना प्रसाद दिला जातो. दरम्यानच्या काळात फाल्गुन वद्य पंचमी (रंगपंचमी) साठी निवई वाडी येथे वडाखाली स्थानापन्न होते. यादिवशी रंगपंचमी निमित्त श्री सत्यनारायणाची पुजा संपन्न होते. सायंकाळी सर्व भक्तगण मिळुन रंगपंचमी खेळतात. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम होतो.

१६. भोवरी (शिंपणे) पूर्ण झाल्यावर सर्व भक्तगण मिळुन सहाणेवर श्रमपरिहारार्थ भोजन केले जाते. सायंकाळी चव्हाटा येथे होमाच्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो. प्रसाद म्हणून (घुघाऱ्या) पावते वाटले जातात. त्यानंतर ढोल, ताशे, सूर, सनईच्या गजरात व सांगता नमनाने होते.

१७. या पर्वणीचा शेवटचा दिवस सुर, सनई, ढोल, ताशाच्या गजरात खेळवत पालखी मंदिरात येते व मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून मंदिरात स्थानापन्न होते व देवीचे रूप काढले जाते. याठिकाणी उत्सवाची (पर्वनीची) सांगता होते. हि पर्वणी गावात सुवर्ण कांचन योग पर्वणी मानली जाते. मंदिराची स्थापना अचुक दिनांक उपलब्ध नसुन ऐतिहासिक दस्त ऐवज व पुरावे यावरून मंदिराची स्थापना सुमारे ५५० साडेपाचशे वर्षापुर्वी झाली आहे. 

 

कार्यक्रमाची छायाचित्रे

 

 

सढळ हाताने
मदत करा
संपर्क करा

मोबाईल: 91-09221916757

ईमेल :enquiry@trimukhidevi.com

कॉपीराईट २०१२ त्रीमुखीदेवी.कॉम

डोनेट : निशा विजय देसाई

भाषा निवडा : इंग्रजी  •  मराठी